आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून ‘या’ तीन नेत्यांना लागू शकते मंत्रीपदाची लॉटरी

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात सत्ताधारी पक्षांना न्यायालयाने दिलासा दिल्याने आता राज्यातील (Maharashtra Govt) दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल 23 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची रणनिती तयार असून या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना-भाजपचे प्रत्येकी 7-7 आमदार मंत्रिमदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेकडून अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमूलकर आणि बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. तर उर्वरित तिघांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा आहे. महिन्याअखेर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून १ जून पासून नवीन मंत्रिमंडळ अतिशय वेगात कामकाज सुरु करेल असं सांगितले जात आहे.