तालिबानी नेत्यांना ट्वीटरच्या ब्लू टिकची भुरळ, पैसे भरून घेत आहेत सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली – अफगाणिस्तानवर (Afghanistan) राज्य करणाऱ्या तालिबानी (Taliban) अधिकाऱ्यांनी ट्विटरच्या सशुल्क ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेचा वापर करून ट्विटर ब्लू टिक्स (Twitter blue ticks) खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. खरं तर, अलीकडेच मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने वापरकर्त्यांना ब्लू टिक्स देण्याची प्रक्रिया बदलली आहे आणि एक नवीन ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे, तेव्हापासून सोशल मीडिया अकाउंट्सची पडताळणी करण्यासाठी ट्विटरवरून ब्लू टिक्स खरेदी केली जात आहे. ही सेवा यापूर्वीही सुरू करण्यात आली होती, परंतु बनावट खात्यांच्या समस्येमुळे ती आधी बंद करण्यात आली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबानशी संबंधित काही लोकांना ट्विटरचे ब्लू टिक सब्सक्रिप्शन देखील मिळाले होते आणि त्यांच्या खात्यात ब्लू टिक आली होती, परंतु काही वेळानंतर ट्विटरने त्यांच्याकडून ब्लू टिक काढून घेतली. ट्विटर व्हेरिफिकेशन (Twitter Verification) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या संस्थेच्या अधिकाऱ्यांना ट्विटरवर ब्लू टिक मिळू शकेल, असा दावा केला जात आहे.