महानगरपालिकेचे नालेसफाईचे दावे म्हणजे रतन खत्रीचे आकडे –  आशिष शेलार

मुंबई  – पावसाळा जवळ आला असताना मुंबई महानगर पालिकेकडून नालेसफाई झाली आहे असे सांगत जे आकडे फेकले जात आहेत ते केवळ रतन खत्रीचे आकडे आहेत, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Mumbai BJP President MLA & Ashish Shelar) यांनी केली. केवळ २५ ते ३० टक्के काम झाल्याने नालेसफाईच्या कामात निष्काळजीपणा असून भाजप याबाबत असमाधानी असल्याचे ही त्यांनी सांगितले.

भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज पश्चिम उपनगरातील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. पश्चिम उपनगरातील साऊथ एव्हेन्यू नगर – गझदर बांध नाला, पवन हंस नाला व एस.एन.डी.टी. नाला, गजधर बांध पंपिंग स्टेशन, मिलिनेयम क्लब जवळ इर्ला नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला यांची पाहणी त्यांनी यावेळी केली.

या दौऱ्यात आमदार अमित साटम भारती लवेकर माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, उज्वला मोडक, अभिजित सामंत, हेतल गाला, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, योगिराज दाभाडकर, (Former corporators Prabhakar Shinde, Bhalchandra Shirsat, Vinod Mishra, Ujwala Modak, Abhijit Samant, Hetal Gala, Alka Kerkar, Swapna Mhatre, Yogiraj Dabhadkar,)आदींसह वाँर्ड आँफीसर विनायक विसपुते यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.

नालेसफाई पाहणी नंतर माध्यमांशी बोलताना अँड शेलार म्हणाले, राहुल नगर नाल्यात सफाईचे कामच झालेले नाही. गझदरबंध नाल्याचे काम आज सुरु केले आहे. आजच जेसीबी लावत तिथे गाळाचा अंदाज घेतला गेला. तर गझदरबंध पंपिंग स्टेशन समोर गाळाचे ढीग लागले आहेत. एसएनडीटी नाल्याचे काम ही नुकतेच सुरु झाले असून बेस्ट काँलनी नाल्यात वनस्पती उगवलेल्या दिसतायत. प्रत्यक्षात केवळ २५ ते ३० टक्के काम झाले असताना महानगर पालिका करत असलेले ७० ते ८० टक्के सफाईचे दावे म्हणजे रतन खत्रीचे आकडे आहेत.

शहरातील पावसाच्या पाण्याचा नीट निचरा व्हावा ही मुंबईकरांची गेली वर्षानुवर्षे अपेक्षा आहे. मात्र गेले २५ वर्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने याकडे संपुर्ण दुर्लक्ष केलं. त्यामुळे गेले काही वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टी सर्व नाल्यांची पाहणी महापालिकेचे अधिकारी, नगरसवेक यांच्या सह करत आहे. यातून मुंबईकरांची सेवा आम्ही करतोय. आजच्या पाहणीत दिसतय की, पालिकेचे सर्व दावे कंत्राटदारांच्या जीवावर होत आहेत. निष्काळजीपणा सुरु आहे. नालेसफाईच्या २८० कोटीं पेक्षा जास्तच्या कामासाठी जे कंत्राटदार नियुक्त केले आहेत ते उद्धव ठाकरेंच्याच जवळचे, त्यांच्याच सत्ता काळातील आहेत. त्यांच्यावर आमचा, मुंबईकरांचा भरवसा नाही.

आम्ही या कामाबाबत असमाधानी आहोत. कंत्राटदार गाळ मोजणीतच हातचलाखी करत आहे. उद्धवजींच्या जवळच्या कंत्राटदाराने केलेला हा भ्रष्टाचार केला आहे. यावर चाबुक घेउन मुंबईकरांना सेवा देण्याच काम भाजपा करील अस ही ते म्हणाले. मुंबई महानगर पालिकेत प्रशासक असला तरी जो जो या सगळ्या असमाधानी आणि निष्काळजी कामाला जबाबदार आहे त्या सर्वांना आम्ही जाब विचारु. प्रशासक, कंत्राटदार यांच्याशी नाही तर मुंबईकरांशी आमची बांधीलकी, आमचं नातं आहे असे सांगितले.

आदित्य ठाकरेंची भाषा आम्ही गेले काही दिवस पाहत आहोत. माझ्या वडिलांच्या काळात गेले २५ वर्ष ज्यांना काम मिळत होत त्यांना आता का मिळत नाही अशी कंत्राटदारांची वकिली करणारी त्यांची भाषा आहे. या नालेसफाईत तुमच्या जवळचे, तुमच्या काळातले, कट कारस्थान करणारे कंत्राटदार आजही काम करत आहेत. तुमच्या जवळच्या असलेल्या कंत्राटदारांच्या कामातून शहरात पाणी तुंबणार नाही अशी शाश्वती तुम्ही मुंबईकरांना देणार का ?असा थेट सवाल त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना केला आहे.