INDvsWI : चेतेश्वर पुजारासहित ‘या’ दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता, कसोटी कारकिर्दही धोक्यात!

India vs West Indies: बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (India Tour Of West Indies) भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. यशस्वी जैस्वाल आणि रुतुराज गायकवाड यांना प्रथमच भारतीय कसोटी संघात बोलावण्यात आले आहे. त्याचवेळी मुकेश कुमार दोन्ही फॉरमॅटच्या संघात आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, कॅरेबियन दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातून अनेक मोठे चेहरे गायब आहेत, त्यात सर्वात मोठे नाव चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आहे.

पुजाराचा संघातून बाहेर झाला
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये फ्लॉप झालेल्या चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पुजाराची कामगिरी निराशाजनक होती आणि दोन्ही डावात अत्यंत खराब फटके खेळून तो बाद झाला होता. विजेतेपदाच्या लढतीतील फ्लॉप कामगिरीनंतर पुजाराला कसोटी संघातून वगळण्याची मागणी सातत्याने होत होती.

मोहम्मद शमीलाही स्थान मिळाले नाही
पुजारा व्यतिरिक्त मोहम्मद शमी (Mohammad Shami) हे मोठे नाव आहे ज्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात स्थान मिळालेले नाही. डब्ल्यूटीसी फायनलमध्येही शमीची कामगिरी काही खास नव्हती. विजेतेपदाच्या सामन्यात शमीच्या खात्यात केवळ चार विकेट आल्या. शमीचा वनडे संघातही समावेश करण्यात आलेला नाही.

उमेशच्या कारकिर्दीवर संकट
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये संघाचा भाग असलेला उमेश यादव (Umesh Yadav) हे तिसरे नाव आहे ज्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघात निवड झाली नाही. उमेशचा अलीकडचा फॉर्म बऱ्याच दिवसांपासून खराब चालला आहे. उमेश आधीच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर झाला आहे,  त्याला आता कसोटी संघातूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. उमेशसाठी पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग कठीण झाला आहे.