भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका, शाहीन आफ्रिदीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह

 

कराची – UAE मध्ये सुरु होणाऱ्या आशिया कपमध्ये 28 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची चिंता वाढली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. शाहिन आफ्रिदी भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर असू शकतो. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने हे मान्य केले आहे.

शाहीन आफ्रिदी अद्याप गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट संघ शाहीन आफ्रिदीला फिट होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. बाबर आझम म्हणाला की, आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत. आमचे डॉक्टर शाहीन आफ्रिदीची पूर्ण काळजी घेत आहेत.

आफ्रिदीला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी विश्रांतीची गरज आहे. पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला, आफ्रिदीला आता अधिक विश्रांतीची गरज आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी वेळ हवा आहे. आफ्रिदीच्या फिटनेस आणि आरोग्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आशिया चषकापर्यंत तो बरा असावा अशी आमची इच्छा आहे.

आशिया चषकासाठी पाकिस्तानने शाहीन आफ्रिदीशिवाय आणखी चार वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. पाकिस्तान संघात हरिस रौफ व्यतिरिक्त शाहनवाज धाहानी, नसीम शाह आणि मोहम्मद वसीम यांच्या नावाचा समावेश आहे.

बाबर आझमने कबूल केले आहे की आशिया चषक स्पर्धेतील आपला प्रवास भारतासारख्या संघासह सुरू होणार आहे आणि हा सामना त्याच्यासाठी खूप दबावाचा असणार आहे.