अकाली दलाचा मोठा निर्णय, प्रकाशसिंग बादल निवडणूक लढवणार

चंडीगड – शिरोमणी अकाली दलाने माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया दोन जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. मजिठिया हे अमृतसर पूर्व मतदारसंघातून काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी बुधवारी अमृतसरमध्ये ही घोषणा केली. अकाली दलाच्या या निर्णयानंतर अमृतसर पूर्व जागेवरील लढत खूपच रोचक बनली आहे. सिद्धू यांनी गेल्या वेळी ही जागा जिंकली होती. बिक्रम मजिठिया 2007 पासून मजिठातून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी सलग तीनही निवडणुका जिंकल्या आहेत. आता अकाली दलाने मजिठिया यांना सिद्धू यांच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी मजिठिया अडचणीत अडकले आहेत. ड्रग्ज प्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला असून, आता त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय उरला आहे. उच्च न्यायालयाने मजिठिया यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष त्यांच्यावर निशाणा साधत आहेत, तर अकाली नेते हे आरोप निराधार ठरवत आहेत. पुढील महिन्यात पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, अशा परिस्थितीत सर्वच पक्ष आपापल्या परीने प्रयत्नात गुंतले आहेत.