भाऊ… नागपुरात चाललंय तरी काय ? कधी दिसतो बिबट तर कधी मगर

नागपूर: कधी काळी नागपूरकरांची तहान भागविणाऱ्या नाग नदीला आज नाल्याचे स्वरूप आले आहे. अशा या नाल्यामध्ये कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसतात. याच ढिगाऱ्यात आपली भूक भागविण्यासाठी उंदीर आणि इतर कीटक कचऱ्यात दिसतात. काही दिवसांपूर्वी भुकेने व्याकुळ एक बिबट नाग नदीत आढळला होता. कालांतराने धरमपेठ सारख्या नागरी वसाहतीतून वाहणाऱ्या नदीत मगर दिसून आली, अशीच एक घटना आज पुन्हा घडली आहे.

वारंवार वन्य प्राण्याचे नाग नदीत दर्शन होत होत असल्याने भाऊ नागपुरात चाललंय तरी काय असा सवाल नागपूरकर विचारात आहेत.सीताबर्डीकडून मोक्षधाम घाटाकडे वाहणाऱ्या नाग नदीत आज पुन्हा मगरीचे दर्शन झाले आहे. शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या नाग नदीत दुसऱ्यांदा मगर दिसल्याने अचानक सर्वत्र खळबळ उडाली आहे.

वनविभागाचे अधिकारी या मगरचा शोध घेत असल्याचे सांगितल्या जात आहे. परंतु अद्याप मगरचा सुगावा लागलेला नाही. नाग नदीवरील लोखंडी पुलाखाली मगर दिसल्याचे काळातच बघ्यांनी गर्दी केली. ही मगर आढळल्याने ती नेमकी आली कुठून, नागरी वसाहतीच्या इतक्या जवळ मगर आढळल्याने नदीच्या किनाऱ्याजवळ राहणाऱ्या घरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.