BJP : सर्वोच्च समितीतून गडकरींना वगळले..तर फडणविसांना निवडणूक समितीवर स्थान

नवी दिल्ली : पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून राज्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळाले आहे, त्यांची केंद्रात एन्ट्री झाली आहे. केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान मिळाले आहे. आज समितीने आपल्या सदस्यांची नावे जाहीर केली. यात फडणवीस यांचा समावेश आहे, समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा आहेत.

भाजपने (BJP) त्यांचे संसदीय मंडळ (Parliamentary Board) आणि केंद्रीय निवडणूक समिती (Election committee) जाहीर केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना संसदीय मंडळातून वगळण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे या संसदीय मंडळाचे आणि भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. सर्बानंद सोनोवाल आणि बी एस येडियुरप्पा यांचा भाजपच्या बोर्डात समावेश करण्यात आला आहे. संसदीय मंडळ ही भाजपची सर्वात शक्तिशाली संस्था मानली जाते. पक्षाचे सर्व मोठे निर्णय या मंडळाच्या माध्यमातून घेतले जातात.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संसदीय मंडळात स्थान मिळाले नाही, परंतू, त्यांना निवडणूक समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. ही आणखी एक ताकदवान संस्था आहे. तसेच वनमंत्री भूपेंद्र यादव आणि मूळचे राजस्थानचे असलेले ओम माथूर यांनाही या निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.