पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : पुणे शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्यामाध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, सुनील देवधर, धीरज घाटे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, अभिनेता क्षितिज दाते आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘सीएसआर बँक’ विकसित करण्यात येणार आहे. स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांचे अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील पुणे शहर अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुणे शहराचा सर्वांगिण विकास हीच स्व. मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल,असे पाटील म्हणाले.

स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रुग्णालय येथे कर्करोगांवर उपचार करण्यात आले. या रुग्णालयात सामान्य नागरिकांना कर्करोगांचे मोफत उपचार मिळावेत, याकरीता त्यांच्या नावाने ‘पेटस्कॅन केंद्र’ सुरु करण्यात येणार आहे. रेडिएशन उपचार पद्धतीदेखील उपलब्ध करुन देण्यात येईल, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगावरील महागडे उपचार मोफत मिळण्यास मदत होणार आहे.

मुळीक म्हणाले, स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांच्या महापौरपदाच्या काळात आधुनिक पुण्याचे नेतृत्व दिसून येते. त्यांच्या काळात पुणे मेट्रो कामांचा पाठपुरावा, ऐतिहासिक वास्तूंमध्ये क्रांतीकांरकाचे संग्रहालय आदी कल्पना त्यांनी मांडल्या. त्या आज पूर्ण होतांना दिसत आहेत.

ठाकूर म्हणाले, पुणे शहरात विविध क्रांतीकारक होऊन गेलेत. या क्रांतिकारकांची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे बलिदान लक्षात घेता आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. नागरिकांच्या मनात देशप्रेम निर्माण करण्यासाठी अशा वास्तूचे जतन करण्याची गरज आहे, असेही श्री. ठाकूर म्हणाले.

मोहोळ, देवधर, घाटे यांनीही विचार व्यक्त केले.

शैलेश टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रांतीकारकारकाचे संग्रहालय ही मुक्ता टिळक यांची संकल्पना होती; आज त्याचे लोकार्पण होत असल्याचा आनंद होत आहे. पुणे शहरातील वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेकडून नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या देखभालीबाबत करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली