ईडीचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला – मिटकरी

Mumbai – राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी सकाळी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि त्यांची पत्नी यांची चौकशी सुरु आहे. शिवसैनिक जमू लागल्याने पोलिसांचा आणखी फौजफाटा मागविण्यात आला आहे. राऊत यांना ईडी आज ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यांना ईडीच्या कार्यालयात नेले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक अजब दावा केला आहे. राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाने ची ही नवी खेळी . आज ईडीचे पाहुणे श्री संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला.असं ते म्हणाले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.