बॉलिवूडच्या ‘अंतिम’ निर्णयामुळे होतेय मराठी चित्रपटांची गळचेपी ‘जयंती’ चित्रपट हे एक ज्वलंत उदाहरण

मुंबई : सरकारने चित्रपटगृहे सुरु करण्यास दिलेली परवानगी तसेच दिवाळीच्या ऐन मौक्यावर निर्माण झालेले उत्साही वातावरण, यामुळे तब्बल २० महिन्यांच्या कालावधी नंतर प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये नक्कीच गर्दी करणार या आनंदात असलेले मराठी चित्रपट निर्माते तसेच दिग्दर्शक अचानक पणे झालेल्या एका बॉलिवूड चित्रपटाच्या “एंट्री” मुळे प्रश्नात पडले आहेत.

सर्व प्रकारचे परिपूर्ण नियोजन करून प्रदर्शनाची तारीख जवळपास ८ आठवडे अगोदर जाहीर करून सर्वत्र चर्चा झालेला मराठी चित्रपट “जयंती” येत्या २६ नोव्हेंबर ला प्रदर्शित होण्याच्या वाटेवर होता परंतु बॉलिवूडचा “बिग बजेट” चित्रपट “अंतिम” नेमका २६ नोव्हेंबर रोजीच प्रदर्शित होत असल्याची अचानक घोषणा झाली आणि परिणामी या निर्णयामुळे महाराष्ट्रात परत मराठी चित्रपटांची गळचेपी होतेय की काय अशी परिस्थिती दिसून आली.

एक चित्रपट विश्लेषक सांगतात की, खूप आधीपासून चालत आलेल्या बॉलिवूड सिनेमांच्या “दादागिरी”चे मराठी चित्रपट नेहमीच “शिकार” बनतात आणि चांगल्या विषयाचे मराठी भाषिक सिनेमे याच कारणामुळे प्रेक्षकांपासून वंचित राहतात. वैश्विक महामारी मुळे जग थांबले असताना चित्रपटसृष्टीला देखील बऱ्याच काळापुरता विराम लागला होता पण आता परिस्थिती पूर्ववत येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने चित्रपट प्रदर्शनाच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आणि मराठी चित्रपट निर्मात्यांना थोडासा का होईना पण दिलासा मिळाला. २६ नोव्हेबंर ला येणाऱ्या “अंतिम” या बॉलिवूड चित्रपटामुळे त्याच तारखेला येणाऱ्या “जयंती” सिनेमाला मात्र याचा फटका बसला असता.

जर जयंतीने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असती तर “गोदावरी” हा मराठी चित्रपट आहे आणि एक पाऊल मागे टाकले तर “झिम्मा” हा मराठी चित्रपट वाटेवर आहे. बॉलिवूड जिथे मराठी चित्रपटांचा विचार न करता सरसकट निर्णय घेतय तिथे जयंती च्या निर्मात्यांनी चित्रपटांच्या शर्यतीचा फटका बाकी मराठी चित्रपटांना बसू नये यासाठी आपल्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख आता १२ नोव्हेंबर अशी ठरवली असावी हे त्यांनी सोशल मीडियाद्वारे जारी केलेल्या पोस्टद्वारे समजून येते. चित्रपटाबद्दल प्रबोधन, प्रमोशन तसेच जाहिरातींसाठी निर्मात्यांकडे खूपच कमी अवधी जरी असला तरी चित्रपटाचे नाव आणि विषय या जोरावर ते हे आव्हान पेलवत आहेत असे दिसून येते. यानिमित्ताने सोशल मीडियावर जारी झालेल्या नव्या पोस्टरद्वारे दिसणारा अभिनेता ऋतुराज वानखेडे आणि अभिनेत्री तितिक्षा तावडे यांची नवी कोरी जोडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे .

दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” हा दर्जेदार मराठी सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.

हे ही पहा: