हवेत उडणारी बस आणणार, माझ्याकडे पैशाची कमी नाही ; गडकरींची मोठी घोषणा

नवी दिल्ली : आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्यांची मोठी फौज मैदानात उतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे प्रचार सभा संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश मधील जनतेला हवेत उडणारी बस लवकरच आणणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या या आश्वासनाची चर्चा संपूर्ण देशात केली जात आहे.

नितीन गडकरी प्रचार सभेत म्हणाले की, आपल्या सगळ्यांसाठी आगामी काळात हवेत उडणारी बस आणणार आहे. त्यासाठी हवाई बसचा डीपीआर देखील मी तयार करून ठेवला आहे. तसेच सी प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक कामे करणार आहोत. प्रयागराजमध्ये रस्त्याच्या वर हवेत चालणारी बस चालवू. तुम्ही रस्ता तयार करुन घ्या. माझ्या विभागाकडे पैसा आहे. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. मी करोडोंमध्येच चर्चा करतो. यांसदर्भात मी उपमुख्यमंत्री केशव चौर्यं यांनी देखील सांगितले आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर उस उत्पादन केले जात आहे. त्यामुळे कारखान्यातील उरलेल्या भागांचा तसेच त्यांच्या सहाय्याने इथेनॉल चा वापर वाहनातील इंधन म्हणून केला जाईल. त्यामुळे इथेनॉलच्या वापरामुळे वाहनासाठी लागणाऱ्या इंधनाची किंमत कमी होऊन १०० रुपये लीटर पेट्रोलच्या तुलनेत ६८ वर येईल.असंही गडकरी म्हणाले.

उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूक ही सात टप्प्यात होत असून सगळे राजकीय नेते मैदानात उतरले आहेत. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये राजकीय पक्षांकडून आता मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत.