समृद्धी महामार्गावर प्रवासी बसचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता (Buldhana Bus Accident) अपघात झाला. बुलढाण्यात बसला लागलेल्या आगीत २६ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पीएमओ आणि राज्य सरकारकडून नुकसानभरपाईची रक्कम दिली जाणार आहे. त्याचबरोबर जखमींना पंतप्रधानांकडून नुकसानभरपाईची रक्कम मिळेल, तर त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे.

ही खासगी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यामधील आठ प्रवासी सुखरुप आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे