चंद्रकांत दादा म्हणाले मसणात जा, संतापाचे रूपांतर व्यक्तिगत का?

बीड – मध्यप्रदेशच्या सरकारने न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजु सक्षमपणे मांडताच त्या राज्यात ओबीसीच्या बाजुने न्यायालयाने निकाल दिला. महाराष्ट्रात सत्ताधार्‍यांनी ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा करताना कुटनिती रचत न्यायालयात सरकार सक्षम बाजु मांडु शकले नाही. कारण ठाकरे सरकारच्या पोटात ओबीसीला आरक्षण देण्याबाबत पापच होते. मध्यप्रदेशनं दिलं तर महाराष्ट्र सरकार का देत नाही?यासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा निघाला. एकीकडे राष्ट्रवादीचा ओबीसी मेळावा तर दुसरीकडे भाजपचा मोर्चा, मेळाव्यात खा.सुप्रियाताईंनी मध्यप्रदेश सरकारने मिळवलेल्या आरक्षणावर शाब्दिक टिका केली. अर्थात एका रात्रीत काय घडलं? असा सवाल उपस्थित केला. भाजपचा मोर्चा ठाकरे सरकारच्या विरोधात होता. केवळ सरकारच्या अनास्थामुळे हे आरक्षण मिळत नाही म्हणुन भाजप नेते संतापुन गेले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सहज स्वभावी शब्दांत त्यांनी सत्ताधार्‍यावर टिका करताना तुम्ही दिल्ली जा, मुंबई जा, कुठेही जा एवढेच नाही तर मसणात जा पण आम्हाला आरक्षण द्या अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया खा.सुप्रियाताई यांना व्यक्तिगत नव्हती पण नेहमीच्या स्टाईलने सत्ताधार्‍यांनी पराचा कावळा करत सदर प्रतिक्रिया व्यक्तिगत घेवुन लोेकप्रियता मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला.असं  भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो हे प्रश्न केवळ सरकारच्या कुटनितीमुळे रखडुन पडले. आरक्षण मिळु नये अशी निती सत्ताधार्‍यांची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहिर झाल्या. त्यातच न्यायालयात ओबीसी आरक्षण टिकलं नाही. याला जबाबदार केवळ म्हणजे केवळ ठाकरे सरकारच म्हणावे लागेल. एक तर न्यायालयात सक्षमपणे बाजु मांडली नाही, आयोगाला वेळेवर निधी उपलब्ध करून दिला नाही. इंपिरिकल डाटाही भिजत घोंगड्यासारखा ठेवला. न्यायालयाने आरक्षणच रद्द करून टाकले. याची जबाबदारी सत्ताधार्‍यांवर जाते. खरा आरक्षणाचा खुन महाविकास आघाडी सरकारनेच केला असं म्हटलं तर वावगे नाही. दुसरीकडे मागच्या आठवड्यात मध्यप्रदेशात न्यायालयाने ओबीसीला आरक्षण दिलं. वास्तविक तिथेही रद्द झालं होतं. पण त्या राज्यातील सरकारने ओबीसी आरक्षणाची सक्षमपणे बाजु न्यायालयात मांडली. परिणाम आरक्षण मिळालं. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण देण्यात यावं अशी मागणी भाजपाकडून चौफेर झाली.

या प्रश्नावर सत्ताधार्‍यांची कोंडी होणं साहजिकच. मग तेही आरक्षणाचे मेळावे घेवू लागले. स्वत: शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत परवा ओबीसीचा आरक्षण मेळावा पार पडला. राज्य सरकारला दोषी न ठरवता नेहमीप्रमाणे पवारांनी केंद्र सरकारवरच आरोप प्रत्यारोप केले. याच मेळाव्यात खा.सुप्रियाताईचं भाषण झालं. मध्यप्रदेशात मिळालेल्या आरक्षणाचं स्वागत करण्यापेक्षा तेथील मुख्यमंत्री दिल्लीला जातात काय?कुणाला भेटले? कुठे गेले आणि एका रात्रीत असं काय घडलं? ज्यामुळे आरक्षण मिळालं. खरं म्हणजे आरक्षणाच्या प्रश्नावर मध्यप्रदेश सरकारचं कौतुक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं असतं तर चांगला संदेश गेला असता पण राज्यातील सत्ताधारी विरोधकांचं काहीही चांगलं असलं तरी त्याला चांगलं म्हणायचं नाही आणि मोडीत काढायचं त्यासाठी कायदा हातात घेण्यापर्यंत ही मंडळी जाते. अनेक प्रसंगावरून यांची रूपे महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळतात तो भाग वेगळा. मध्यप्रदेशात आरक्षण मिळाल्यानंतर आपल्या राज्यातील ओबीसी समाजाच्या अपेक्षा उंचावणे साहजिकच. पण हे सारं फेलीवर ठाकरे सरकारचं आहे याची खात्री ओबीसी समाजापर्यंत जावुन पोहोचल्यानंतर उत्तरात तोंडाला तोंड द्यायचं म्हणुन सत्ताधारी  आरोपाचे गुर्‍हाळ चालु लागली. मुंबईत परवा भाजपाचा ओबीसी मेळावा मोठ्या प्रमाणावर निघाला. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व इतर नेते रस्त्यावर उतरले होते. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मिळालेलं आरक्षण टिकवता आलं नाही हा संताप भाजप नेत्यांच्या मनात ओठावर येवुन ठेपला.

रस्त्यावर चालत असताना पत्रकारांनी सुप्रियाताईच्या भाषणाचा आधार घेत काही प्रश्नांची उत्तरे मागितली. तेव्हा उद्विग्न झालेल्या चंद्रकांत पाटलांचा संताप अनावर झाला. वैतागुन बोलताना ते म्हणाले आरक्षण मिळवण्यासाठी दिल्ली जा, मुंबई जा नव्हे तर मसणात जा आणि देत नसाल तर मग घरी जावुन स्वयंपाक करा. या बोलण्याचा अर्थ राष्ट्रवादीच्या काही मंडळींना सुप्रियाताईंच्या व्यक्तिनेतृत्वाशी जोडला. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे राष्ट्रवादीच्या मंडळीला मराठी भाषा, एका शब्दाचे द्वयार्थ एवढेच नव्हे तर त्याचे अलंकार समजावुन घेण्याची गरज असं म्हणायची वेळ आली आहे. मुळात ते वक्तव्ये सुप्रियाताई व्यक्तीशी जोडणे हाच वेडेपणा म्हणावा लागेल. मसणात जा हा शब्द महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात उद्विग्न झालेल्या माणसाच्या तोंडुन निघतोच. त्यांनी या शब्दाचा वापर राज्यातील सत्ताधार्‍यांच्या बाबतीत केला आणि त्याहुन अधिक जर तुम्हाला देता येत नाही तर घरी जावुन स्वयंपाक करा हा अर्थ म्हणजे ठाकरे सरकार आणि त्यांचे नेते नाकर्ते आणि अकार्यक्षम आहेत. म्हणुन तुम्ही स्वयंपाक करा या भाषेत त्यांनी ठणकावले. पण नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे नेते मंडळी व्यक्तिगत अस्तित्व वाढवण्यासाठी नको त्या शब्दाचा पराचा कावळा करतात आणि माध्यमासमोर येवुन बोंबलतात. लगेच आंदोलन सुरू करतात. त्यापेक्षा वैचारिक पातळीवर विरोधकांनी सोडलेल्या शब्दांचे बाण त्याचा सामना शब्दानं करणे हाच खरा लोकशाहीचा अलंकार म्हणावा लागेल.

दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात आणि अध्यात्म क्षेत्रात वक्त्यांना भाषेचा अलंकार क्षम्य असतो. असं जाहीरपणे अनेकदा संत-महात्मे किर्तनकार सांगतात. काही दिवसापुर्वी प्रसिद्ध किर्तनकार रामायणाचार्य रामराव ढोक महाराजांनी यावर भाष्य केलं होतं. याचा अर्थ असा मराठी मायबोली आणि तिची सुंदरता प्रत्येक शब्दागणिक आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ काढले जातात. पण एका शब्दाचा उलट अर्थ राजकारणात लावुन केवळ व्यक्ति महात्म्ये वाढवण्यासाठी करणे अशोभनीय वाटते. अनेकदा राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब उद्विग्न झाल्यानंतर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासुन भाजपाच्या इतर नेत्यावर आरोप करतात. कारण संतापाची भाषा नेत्यांच्या तोंडातून निघते. तसंच काही चंद्रकांतदादा पाटील यांचं झालं. हे सरकार आरक्षणासाठी वेगवेगळे नाटके कशी करते? आणि ओबीसी समाजाला कसं झुलवत ठेवते? हे सत्य आता समोर आलं आहे. सत्ताधार्‍यांना ओबीसी समाजाला बाजुला टाकुन निवडणुका घेण्याचा त्यांचा डाव मुळात आहे. त्यांच्या पोटातलं पाप उघडं पडत असल्याने बिथरल्याच्या भाषेत शब्दांची चिखलफेक करत विरोधकांच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ काढून कुठलाही विषय वेगळ्या दिशेने घेवुन जाण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. ठाकरे सरकारचा स्वभाव हाच बनला. म्हणुनच चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या अभ्यासु नेत्याला आलेला संताप प्रकटीकरणासाठी राहावले नाहीत. पण शब्दांचे भाव न समजुन घेता वेगळाच अर्थ काढीत राष्ट्रवादीची मंडळी बोंबा मारताना दिसते.