‘कायदा हातात घेतल्यावर जी शिक्षा व्हायची ती होणार’, चंद्रकांत पाटलांचा जितेंद्र आव्हाडांना टोला

Chandrakant Patil : ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी नुकताच ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. तसेच काही प्रेक्षकांना मारहाण देखील केल्याचा आरोप आहे. आता याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. एकूणच या सर्व प्रकरणावर राजकीय वर्तृळातुन प्रतिक्रिया येत आहेत. अशाच भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून ‘जर तुम्ही कायदा हातात घेतल्यावर जी शिक्षा व्हायची ती होणार’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“एखादा चित्रपट तुम्हाला आवडला नाही, तर सिनेमागृहाबाहेर गळ्यात बोर्ड लटकवून उभे राहा आणि चित्रपट पाहू नका असे सांगा. या आवाहनाला ज्यांना प्रतिसाद द्यायचा असेल ते देतील. कायदा हातात घेतल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होणारच,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे.

तसेच जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्या नंतर जयंत पाटील यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “तुम्ही म्हणाल तो इतिहास आहे का? प्रत्येकाला जो इतिहास काळाला, प्रत्येकाच्या भावविश्वाला जे भावलं त्यानुसार ते मांडणार. ही काही हुकुमशाही आहे का आहे,” असा टोला सुद्धा चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आणि ही दादागिरी चालणार नाही असंही ते म्हणाले.