चंद्रशेखर बावनकुळेंनी सतीश उकेला पाठवली ५० कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस

नागपूर : माजी ऊर्जामंत्री आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात वादग्रस्त वकील सतीश उके याने कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा असल्याचे आरोप केले होते. पण या आरोपात तथ्य नसून, खोट्या आरोपांच्या माध्यमातून प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

आज त्यांनी वकील सतीश उकेला ५० कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीची न्यायालयीन नोटीस बजावली आहे. महत्त्वाचे म्हणजे या संदर्भात बावनकुळे फौजदारी गुन्हा दाखल करणार आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माझे नातलग सुरज तातोडे याने केलेले सर्व आरोप निराधार असून राजकीय षडयंत्र रचून आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. कुणाच्या घरात कलह निर्माण करायचा, नातेवाइकाला पकडायचे, भडकवायचे आणि खोटेनाटे आरोप करायचे, हे काम सुरज तातोडे याच्या माध्यमातून वकील सतीश उके करत आहे. म्हणून आज त्याला ही न्यायालयीन नोटीस पाठवली आहे.