‘वेळ निभावून नेण्यासाठी विधानं करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवावा’

नागपूर : मराठा आरक्षण पदरी पाडून घेण्यासाठी महाराष्ट्रात थेट छत्रपतींना उपोषणाला बसावे लागते. आता उपोषण थांबविण्यासाठी महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. इतके प्रयत्न आरक्षण मिळवून देण्यासाठी केले असते तरी ते भरपूर झाले असते असे विधान भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली अन् महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपण मराठा आरक्षणाबाबत किती आग्रही आहोत हे दाखविण्याचा कामचलाऊ प्रयत्न सुरू केला आहे. काल परवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर ते मराठ्यांच्याच पोटी जन्माला आल्याचे सांगून टाकले. मग मराठा आरक्षणाचा नेमका मुद्दा अडतोय कुठे असा प्रश्न आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ असे अजित दादा पवार सांगत आहेत. पण असं विधान करताना ते आरक्षणाच्या खऱ्या अहवालाविषयी काहीच भाष्य करत नाहीत. राज्यातील मराठा समाजाने अजून किती दिवस वाट बघायची हे तरी त्यांनी सांगावे. वेळ निभावून नेण्यासाठी विधानं करण्यापेक्षा उपमुख्यमंत्री म्हणून आरक्षणाचा मुद्दा सोडवावा अशी विनंती आ. बावनकुळेंनी केली आहे.