ठोकून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा; शिंदे गटातील आमदाराचे चिथावणीखोर वक्तव्य

मुंबई : आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी रविवारी दहिसरमधील एका कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे सुर्वे यांची चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने सुर्वे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.

सुर्वे याचं नेमकं वक्तव्य काय आहे ?

‘आपण गाफील राहायचं नाही. पण यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय अपण गप्प बसायचं नाही. कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही. कुणी अरे केलं तर त्याला कारे करा, प्रकाश सुर्वे इथं बसलाय. ठोकून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो मी, चिंता करु नका. आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण अंगावर आला तर शिंगावर घेऊन कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवून राहा’, असं वक्तव्य असलेली आमदार प्रकाश सुर्वे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

उदेश पाटेकर काय म्हणाले?

आज लोकशाही प्रधान देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जर देशाच्या संविधानाचे, लोकशाहीचे विश्वस्त समजले जाणारे आमदारच जर अशी प्रक्षोभक भाषणे करुन तरुण कार्यकर्त्यांना तुम्ही गुन्हे गारी करा, मी तुम्हाला सोडून आणेन, असे बोलून लोकशाहीची थट्टा करणार असतील, प्रभागात जीवे मारण्याच्या जाहीर धमक्या लोकांना देणार असतील तर हे अतिशय लज्जास्पद आणि संतापजनक आहे, असं उदेश पाटेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.