अकोला शहरातील प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प लवकर पूर्ण करा – अमोल मिटकरी

मुंबई – अकोला महानगरपालिकेतर्फे अकोट फैल परिसरातील नायगाव डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची विल्हेवाट न लावता तसेच बायोमायनिंग (Biomining Project) प्रक्रिया न राबविता कचरा जाळण्यात येत आहे. यामुळे अकोला शहरात जळलेल्या कचऱ्यातून विषारी धूर, विषारी वायू हवेमध्ये मिसळून श्वसन नलिकेद्वारे शरीरात जात असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हा मुद्दा आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत उपस्थित केला.

चार वर्षांपूर्वी राज्यातील प्रदुषणाचे सर्वेक्षण (Pollution Survey) करण्यात आले होते. त्यात सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये अकोला शहराचा समावेश होता. त्यावर अकोला महानगरपालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच बायोमायनिंग प्रकल्प कधी पूर्ण करणार, असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी विचारला. मंत्र्यांच्या लेखी उत्तरात नायगाव डम्पिंग ग्राऊंडचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याची चुकीची माहिती दिली असून ही माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

अमोल मिटकरी यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बायोमायनिंग प्रक्रिया करण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. सहा महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केले जाईल. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना केली याची माहिती घेतली जाईल व कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही सांगितले.