Breaking News : शरद पवारांची साथ सोडत आणखी तीन आमदार अजितदादांच्या गटात ?

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान, अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पक्ष व चिन्ह मिळविण्यासाठी, अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांना ३७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यासाठी अजित पवार हे आपल्याकडे आमदार खेचत आहेत. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पुण्याचे आमदार चेतन तुपे, सुनील भुसारा या तिन्ही आमदारांनी गुरुवारी रात्री अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे आमदार अजित पवारांबरोबर जाण्याची शक्यता आहे. अद्याप या आमदारांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे तिन्ही आमदार हे काल शरद पवार यांच्याबरोबर होते. मुंबईत मेळाव्याला उपस्थित होते. परंतु गुरुवारी रात्री तिन्ही आमदार हे अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेले आहेत.