काम न करणाऱ्या कंत्राटदारांना ‘ काळ्या यादीत’ टाकण्याची काँग्रेसची मागणी

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता डी सी गुप्ता (D C Gupta)यांना मंगळवारी काँग्रेस नेत्यांनी आणि काणकोणच्या लोकांनी  मडगाव- काणकोण महामार्गाचे काम सुरू न केल्याबद्दल घेराव घातला व कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’ करण्याची मागणी केली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पणजी येथील कार्यालयात काणकोणच्या स्थानिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला व तिथे ठाण मांडून बसले. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी (Sirchitnis Janardhan Bhandari)यांच्यासह काणकोण येथील स्थानिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून रस्त्याचे हॉटमिक्सिंग आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली.

त्यांनी आल्तिन्हो-पणजी येथील पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या आवारात निदर्शनेही केली आणि जोपर्यंत खड्डेमय रस्त्यांबाबत ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांना दिला. यावेळी रस्त्याच्या कामाच्या पाठपुराव्याला अधिकारी ‘शून्य प्रतिसाद’ देत असल्याचे भंडारी यांनी सांगितले. आम्ही पीडब्ल्यूडीच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो. मात्र ते रस्ता पूर्ण करण्याबाबत कोणताही प्रतिसाद देत नाहीत. असे भंडारी म्हणाले.

काणकोण येथे नव्याने बांधलेल्या मनोहर पर्रीकर बायपाससह एनएच 66 वरील सर्व प्रलंबित रस्त्यांची कामे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. रस्त्याचे काम सुरू करण्‍यात अपयशी ठरल्‍यास काणकोण-मडगाव महामार्ग वाहन चालविण्‍यासाठी असुरक्षित असल्याचे  घोषित करण्‍याची, नियमित प्रवाशांसाठी मडगाव ते काणकोण पर्यंत हेलिकॉप्‍टर सेवा सुरू करण्‍याची आणि   लोकांना कामाच्या ठिकाणांजवळ राहण्‍याचीही सुविधा द्यावी अशी आमची मागणी आहे.असे भंडारी म्हणाले.

ते म्हणाले की, मडगाव-काणकोण रस्त्यावरील अपघात रोजचेच झाले आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लोकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. अनेकांना पाठीच्या कण्याच्या समस्या होत आहेत. म्हणून, मी  विनंती करतो की एकतर मडगाव-काणकोण रस्ता वाहन चालवण्यासाठी असुरक्षित म्हणून घोषित करावा किंवा अपघात टाळण्यासाठी मडगाव किंवा जवळपासच्या कामाच्या ठिकाणी ‘राहण्याची सोय’ उपलब्ध करून द्यावी. असे भंडारी म्हणाले.