आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडिया पूर्ण ताकदीने उतरणार : सुप्रिया श्रीनेत

पुणे : आगामी लोकसभा निवडणूक ही फक्त काँग्रेस आणि भाजप अशी नसून देशातील लोकशाही वाचविण्यासाठी असलेली अंतिम आरपार लढाई आहे. या लढाईत देशातील लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने सोशल मीडियाला अतिशय गांभीर्याने घेतले असून लोकसभेसाठी भाजपच्या सोशल मीडियावरील अपप्रचाराला प्रत्युत्तर देणासाठी काँग्रेसचा सोशल मीडिया विभाग सज्ज आहे असे अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या व काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत (National Spokesperson of All India Congress and National President of Social Media Department of Congress Supriya Sreenet) यांनी सांगितले.

काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय सोशल मीडिया सत्याग्रह शिबीर व कार्यशाळेचे उदघाटन श्रीनेत यांच्या हस्ते गांधी भवन कोथरूड येथे झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीनेत यांनी भाजपच्या सोशल मीडियावरील खोट्या प्रचारावर कडाडून हल्ला चढवत जशास तसे उत्तर देण्याचा सल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. विविध सोशल मीडिया माध्यमे वापरत असताना इंस्टाग्राम व युट्यूबचा वापर वाढविण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातून सुमारे 150 पदाधिकाऱ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. यावेळी काही नविन नेमणूका देखील करण्यात आल्या. फेसबुक, चॅटजिटीपी, युट्युब, व्हाट्सअप आदी विषयांवर विविध तज्ञ लोकांनी मार्गदर्शन केले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव सोनल पटेल, नितीन आगरवाल, आमदार प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, रवींद्र धंगेकर, उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड आदी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सोशल मीडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी प्रास्ताविक केले तर चैतन्य पुरंदरे यांनी सूत्रसंचालन केले. विजयानंद पोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.