बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट – संजय राऊत

मुंबई – 30 मार्च 2018 ला खासदार संजय राऊतांनी कर्नाटकात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यावर प्रतिक्रिया देताना बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मला बेळगावला बोलावणं हा कट आहे. त्यांना माझ्यावर हल्ला करायचाय. मला अटकही करण्याचा डाव आहे. पण महाराष्ट्र घाबरणारा आणि झुकणारा नाही. मीही या सगळ्याला घाबरणार नाही. मी जाणार आणि आपली बाजू मांडणार. पण बेळगावला बोलवून माझ्यावर हल्ला करण्याचा आणि अटकेचा कट रचला जात आहे, असं संजय राऊत म्हणालेत.