सोमय्या पिता-पुत्र जेलमध्ये जाणार अशी भविष्यवाणी करणाऱ्या संजय राऊत यांनाच झाली अटक

मुंबई – शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी संजय राऊत यांना अटक करण्यात आली. संजय राऊतांच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत.

गोरेगावातील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने खासदार संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांना अटक केल्यानं शिवसेनेला मोठा झटका मानला जात आहे. मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या बाबतीत केलेला एक दावा चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात त्यांनी संजय राऊत, अनिल परब आणि स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील फैलावर घेतलेले होते. या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत कमालीचे आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते.

आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचा सोमय्या पिता- पुत्रांवर राऊत यांनी आरोप केला होता आणि सोबतच बाप बेटे जेल जायेंगे.. अनिल देशमुख नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे.. असं म्हटलं होतं. दरम्यान, या प्रकरणात सोमय्या यांना कोर्टाने दिलासा दिला मात्र आता सोमाय्यांवर आरोप करणारे राऊत हेच अटकेत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून आता संजय राऊत यांना ट्रोल केले जात आहे.