दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने नराधम मुलाने आईचा गळा चिरला, आणि मग….

नागपूर –  नागपुरातील यशोधरानगरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आईने दारुसाठी पैसे न दिल्याने संतापून एका नराधमाने तिच्यावर विळ्याने वार करून खून केला. त्यानंतर या आरोपीने स्वतःच पोलीस ठाणे (Nagpur Police) गाठलं आणि केलेल्या कृत्याची माहिती पोलिसांना दिली.

गोविंद संतराम काटकर (वय 32, वनदेवीनगर) असे आरोपीचे नाव असून विमलाबाई संतराम काटकर (वय 60) असे दुर्दैवी मृत आईचे नाव आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी गोविंदला दारूचे व्यसन असून त्याच्या या सवयीमुळे कुणीही त्याला जास्त दिवस कामावर ठेवत नसे. दारूच्या व्यसनामुळे गोविंदला काही दिवस काम मिळत नव्हते. तो आई विमलाबाई यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. पैसे न दिल्याने गोविंद त्याच्या आईलाही मारहाण करायचा.

रविवारी सकाळी दहा वाजता गोविंदने विमलाबाईंकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सुरुवातीला आईने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. गोविंदकडून सतत छळ होत असल्याने त्यांनी घरच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे गोविंदला राग अनावर झाला आणि त्याने घरातील विळा घेत आईकडे धाव घेतली. त्याने विळ्याने आईचा गळा चिरला आणि खून केला.

दरम्यान आईची हत्या केल्यावर गोविंद थोड्यावेळाने घराबाहेर निघाला. दारूच्या नशेत तो दिवसभर भटकला. सायंकाळी पाचच्या सुमारास नशा उतरल्यावर त्याला नेमके काय करून ठेवले हे लक्षात आले. त्याने स्वतःच यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्याने खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी गोविंदविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.