मंगलमय वातावरणात ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान

पुणे : मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया… च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झाले. मुख्य मंदिरापासून कोतवाल चावडी येथील उत्सवाच्या पारंपरिक जागेपर्यंत फुलांनी सजविलेल्या गरुड रथातून श्रींची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षी गणेशोत्सवात श्री पंचकेदार मंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. श्रीं च्या मूर्तीसोबत देवी सिद्धी, देवी बुद्धी तसेच गणेश परिवारातील मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.

यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मुख्य मंदिरापासून श्रीं ची आगमन मिरवणूक सकाळी ८.३० वाजता फुलांनी साकारलेल्या गरुड रथातून काढण्यात आली. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणुकीची सांगता झाली. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधूंची सनई हे मिरवणुकीच्या अग्रभागी होते . तसेच दरबार बँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग होता. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२.१५ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

असे आहे श्री पंचकेदार मंदिर
भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्रीपंचकेदार मंदिरप्रासाद विराजमान आहे. हे मंदिर केवळ देखावा नसून या मंदिर उभारणीत अनेक प्रतीकांचा, मूर्तींचा आणि लक्ष, लक्ष दिव्यांचा वापर केलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासाद, अनेक देवी-देवतांच्या, व्याल, शार्दुलांच्या, यक्षगणांच्या, सुरसुन्दरी, कमलपुष्पांच्या उत्तुंग शिखरांनी शोभित झाला आहे. श्रीपंचकेदार मंदिर राजप्रासादाच्या उत्तुंग कैलास शिखरावर सुवर्ण कलशाचा आमलक असून, त्यावर सिध्द ओंकाराच्या त्रिशूल-डमरूच्या ध्वजदंडाने शोभायमान झाला आहे. नागांच्या नक्षीदार लतिन कमानीच्या शिखरावर, चारी दिशांना शिव शक्तीचे ; अर्थातच शिवपार्वती मूर्तींचे वास्तव्य आहे. याशिवाय मंदिरामध्ये तसेच रस्त्याच्या दुतर्फा २२१ झुंबर लावण्यात आली असून मारणे इलेक्ट्रीकल्स यांनी लावलेली आहेत. तर, शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे कलादिग्दर्शन, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केले आहे.