‘जे कार्यालयात भेटत नव्हते ते आज गल्ली-बोळात फिरु लागलेत’

सिंधुदुर्ग : आतापर्यंत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील कार्यालयात भेटत नव्हते ते आता गल्ली-बोळात फिरु लागले असल्याची टीका मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. अडीच वर्ष सत्ता असताना हे काही काम करु शकलेले नाहीत. आता केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने विकास कामे खेचून आणत येतात. तर यालाही विरोध दर्शवायचा, हे आता जनता खपवून घेणार नाही. त्यामुळे विकास कामात राजकारण आणू नये असा सल्ला केसरकरांनी विरोधकांना दिला आहे.

ठाकरे कुटुंबियांबद्दल बोलायचे नाही असे ठरवले होते, पण आता खालच्या पातळीवरची टीका होत आहे. त्यामुळे कोणतेही आरोप पुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत. जशाच तसे उत्तर दिले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे.

राज्यात येणाऱ्या उद्योगांना यांच्याकडूनच विरोध होत असल्याचे सांगताना केसरकर यांनी टीका केली आहे.उद्योगधंद्यामध्ये असेच राजकारण येत राहिले तर महाराष्ट्रात प्रकल्प घेऊन येताना संबंधित कंपनी 10 वेळेस विचार करेल असेही केसरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे विकास कामामध्ये राजकारण नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.