नोटबंदी ही सरकारची आर्थिक घोडचूक; राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची टीका

मुंबई   – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची  घोषणा करून भारतीय अर्थव्यवस्थेला खीळ घालण्याच्या घटनेला सहा वर्षे उलटली तरी सरकार अजूनही त्यांच्या गुणवत्तेचे समर्थन करू शकत नाही. नोटबंदी ही सरकारची आर्थिक घोडचूक होती अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

नोटबंदीनंतर किती काळा पैसा जप्त झाला, याची पंतप्रधानांनी राष्ट्राला माहिती द्यायला हवी होती. नोटबंदीने दहशतवादी फंडिंग कसे संपले आणि बनावट चलन प्रणालीतून कसे काढून टाकले गेले? रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलनातून बाद झालेल्या ९९.३ टक्के नोटा बँकेकडे परत आल्याच्या अहवालात नमूद आहे तर उलट आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशाचे रक्षण करताना सामान्य माणसाला कसा त्रास सहन करावा लागला हे जनता कधीही विसरू शकत नाही असेही महेश तपासे म्हणाले.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञांनी भाजप सरकारला नोटबंदी निर्णयाच्या दुष्परिणामांबद्दल सुचना केली होती शिवाय पंतप्रधानांची घोषणा ऐकेपर्यंत केंद्रीय अर्थमंत्री स्वत: च अनभिज्ञ होते त्यामुळे सरकारमध्ये कोण कुणाचा ऐकेल असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

नोटबंदी आणि जीएसटीच्या झपाट्याने अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था कमकुवत केलीच शिवाय त्यानंतरच्या महामारीमुळे राखीव निधी, नोकऱ्या आणि जीडीपी नष्ट झाले. बेरोजगार युवक बेरोजगारीच्या खाईत लोटले गेले असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.