राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून नाराजी; 35 जणांनी दिला मनसेचा राजीनामा

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय (Remove the speakers from all the mosques by 3rd may).

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले.

आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मशिदिबाहेरील भोंग्यांच्या वक्तव्यावरून पक्षातील मुस्लीम कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि मराठवाड्यातील 35 मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. मनविसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांच्यासोबत 35 जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अनेक मुस्लीम कार्यकर्ते मनसेला जोडले गेलेले आहेत. मात्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर ते पक्षावर नाराज असल्याचे समोर येत आहे.