शिवसेनेने फुकंले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग… मिशन ४८ साठी कसली कंबर

Shivsena Loksabha Election 2024– राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti Government) केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.

शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज व्हिसीद्वारे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाइन जोडले गेले होते. या पक्ष पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले.

हे प्रचारमेळावे दोन टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा ६ जानेवारी रोजी यवतमाळ येथुन सुरू होणार असून ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्याना पुन्हा सुरूवात होणार असून २५ जानेवारी रोजी शिर्डी येथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल. या प्रचार मेळाव्यांचा समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.

या शिवसंकल्प अभियानाची तयारी करण्यासाठी एक मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली असून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या साथीने या प्रचार मेळाव्यांची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केले आहे. शिवसंकल्प अभियानाप्रमाणेच महायुतीच्या एकत्रित सभाही राज्यभरात आयोजित करण्यात येतील. शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी शिवसंकल्प अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारचे काम घराघरात पोहचवण्याचा निर्धार

राज्यातील वातावरण सध्या महायुतीला सकारात्मक असून प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करणारे सरकार अशी आपल्या सरकारची जनमानसात ओळख आहे. त्यामुळे सरकारने केलेली चांगली कामे लोकांपर्यंत पोहचवून आपल्याला मते मागायची असल्याचे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून आतापर्यंत २ कोटी ७४ लाख लोकांना प्रत्त्यक्ष लाभ मिळवून देण्यात आले आहेत. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिलेली आहे. महात्मा फुले आरोग्यदायी योजनेची मर्यादा दीड लाखांवरून ५ लााखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत १ रूपयात पीक विमा काढून त्यातील अडीच हजार कोटींचे अग्रीम वाटप करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून ६ हजार आणि राज्य सरकारकडून ६ असे १२ हजार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे, राज्यात ६५ सिंचन प्रकल्पांना सुप्रमा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात आरोग्य आपल्या दारी, महिला बचतगट सक्षमीकरण अभियान, सरपंच आणि ग्रामदूत अभियान राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबईत राबवण्यात येत असलेले संपूर्ण स्वच्छता अभियान आगामी काळात राज्यभर राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारचे हे निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी ‘एलईडी व्हॅन’च्या माध्यमातून प्रत्येक गावागावात फिरवून सरकारच्या कामाबद्दल सकारात्मक वातावरणनिर्मिती करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अयोध्येतील श्री राम प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करा

२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात राम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. हा क्षण कायम लक्षात रहावा यासाठी घराबाहेर भगवा झेंडा लावावा, गुढ्या उभाराव्यात, जोगाजागी दीपोत्सव साजरा करण्यात यावा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. राम मंदिराची उभारणी हे स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि करोडो राम भक्तांचे स्वप्न होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे. अयोध्येतील राम मंदिर हा आपल्यासाठी आस्थेचा विषय असून हा क्षण कायम लक्षात रहावा यासाठी शक्य तिथे हा सोहळा एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून लोकांना लाईव्ह दाखवण्याची सोय उपलब्ध करून द्यावी असेही यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसेच आपापल्या भागातील मंदिरे, ग्रामदेवतांची मंदिरे येथे विद्युत रोषणाई करून हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे निर्देश शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’