माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही… या.. मला अटक करा! – संजय राऊत

Mumbai – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना इडीचे समन्स आले आहे. उद्या 11 वाजता चौकशी साठी त्यांना बोलावण्यात आलं आहे. पत्रावाला चाळ जमीन घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, अजून अशी नोटीस मिळाली नाही असं राऊत यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा! जय महाराष्ट्र! असं राऊत यांनी म्हटले आहे.