राज्यातील कायदा सुव्यवस्था पवारांचे समर्थकच बिघडवतायत; तृप्ती देसाईंचा घणाघात

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलं आहे. केतकीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

केतकी चितळेने  शरद पवार यांच्यावर केलेली ती वादग्रस्त पोस्ट ही 2020 सालची असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी ही पोस्ट तितकी व्हायरल झाली नव्हती, मग आता ती रीपोस्ट करून व्हायरल करण्यामागे काही षडयंत्र आहे का याचा तपास ठाणे पोलीस करत आहेत.

या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच आता या वादामध्ये भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाईंनी (Trupti Desai of Bhumata Brigade) उडी घेतलीय. देसाईंनी केतकीचं समर्थन केलंय. केतकीच्या पोस्टमध्ये थेट नाव घेण्यात आलेलं नाही असं सांगताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केलीय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तिने जर जाणूनबुजून पवारांविरोधात लिहिलं असेल तर तिच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तिला विरोध करतायत, तिला ट्रोलिंग करतायत, तिचे आक्षेपार्ह फोटो टाकतायत, शिवागाळ करतायत मग त्या कारवाई का होत नाही?,” असा प्रश्न तृप्ती देसाईंनी विचारलाय.

“केतकीला अटक झाली तेव्हा आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याबद्दल केली. नंतर तिच्यावर विविध कलम लावले गेले कायदा सुव्यवस्थाचा (Law and order) प्रश्न कोण बिघडवतयं. पवारांचे समर्थकच बिघडवतायत. म्हणून एखाद्या महिलेला टार्गेट केलं जात असेल, कलमं लावली जात असेल तर नक्कीच ते चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध केलाय. जे कोणी केतकी चितळेबद्दल अशा घाणेरड्या कमेंट करतायत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करुन त्यांना तातडीने अटक करावी, अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणीय,” असंही तृप्ती यांनी म्हटलंय.