महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात राज्यपालांना मज्जा येते – ठाकूर

मुंबई  : राज्याचे राज्यपाल महोदय सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत आहेत, हे अवघा महाराष्ट्र पहात असून हे महाराष्ट्रातील आम्ही कुणीही सहन करणार नाही, असा इशारा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिला.

सध्या राज्याचे राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान केल्याप्रकरणी वादात आहेत. तर हे सुरू असताना त्यांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबत अवमानजनक शब्द वापरुन औचित्याचा भंग केल्याचे दिसून येत आहे. मात्र ही गोष्ट राज्यपाल सातत्याने आणि जाणीवपूर्वक करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, त्यांना केवळ गोंधळ घालण्यात स्वारस्य असल्याचे ॲड. ठाकूर म्हणाल्या.

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात त्यांना मज्जा येते, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचा अवमान करण्यात त्यांना मज्जा येते, भारतीय राज्य घटनेचा अवमान करण्यात त्यांना मज्जा येते, असे  दिसते. त्यांना खऱ्या अर्थाने लोकशाहीला धक्का लावण्याचे काम सुरू आहे. त्यांना एवढंच करून थांबायचे नाही तर त्यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची आहे. सत्तेत येण्यासाठी ही सारी धडपड सुरू असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, खरंतर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, त्यांनी निष्पक्षपातीपणे वागायला हवे, मात्र ते एकाची बाजू घेऊन येथे बोलताना, वागताना दिसतात. देशाच्या राष्ट्रगीताचा अवमान हा देशाचा अवमान आहे, त्यांच्याकडून असे वागणे अपेक्षित नाही. माननीय राज्यपालांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रपतींनी गंभीर दखल घेऊन राज्यपालांना परत बोलवलं  पाहिजे. राज्यपालांनी घटनेच्या कक्षेतच राहून आपली वागणूक ठेवली पाहिजे आणि हेच सर्वांना अपेक्षित आहे.

राज्यपालांनी आपल्या घटनात्मक जबाबदारीचं वहन करायचं टाळलंय त्यांनी घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण आहे. राज्यपाल जाणीवपूर्वक राजकारण करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करत आहेत. खरं तर त्यांना राज्याच्या विकासाचा आढावा मांडणारं भाषण करायचंच नव्हतं असं दिसतंय. राज्य सरकारची उपलब्धी सांगायची नव्हती. भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते काम करत असल्याचे दिसून येते, असेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले.