‘युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे सहकार्य नक्कीच मिळेल’

मुंबई   – रशिया-युक्रेन यांच्यामधील संघर्ष वाढत आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.या विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे सहकार्य नक्कीच मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

आपली मुले विदेशात अडकली आहेत या भीतीने पालकांमध्ये अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. यासाठी देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्कात आहोत, अशी माहितीही सुळे यांनी दिली.

कोरोना संक्रमण काळात परदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यावेळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी वेळोवेळी त्यांचे आभारही मानले आहेत. यावेळीदेखील अशाच प्रकारचे सहकार्य त्यांच्याकडून लाभेल, असेही  सुळे म्हणाल्या.