पॉर्न स्टारची भानगड… अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टात हजर होताच अटक

न्यूयॉर्क- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trumph) सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांना काल (०४ एप्रिल) न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार प्रकरणात फौजदारी खटला चालवण्यास मान्यता दिली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार हे निश्चित होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फसवणुकीच्या ३० पेक्षा जास्त गुन्ह्यांचा आरोप आहे. यातील पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला तिचं तोंड गप्प ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप सर्वात गंभीर आरोप आहे.

२०१६ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवर केल्याचा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण स्टॉर्मी डॅनियल्सशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांचं अफेअर असल्याचाही आरोप आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी १ लाख ३० हजार डॉलर्स दिल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी संमती देण्यात आली होती तेव्हापासूनच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप काय आहेत?
राॅयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, मॅनहॅटन जिल्ह्याचे वकील अलविन ब्रॅग यांनी न्यू यॉर्क ग्रँड ज्युरी न्यायालयात पुरावा सादर करताना निदर्शनास आणून दिले की, ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला १ लाख ३० हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.

ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी हे पैसे क्लिफॉर्डला दिले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी मायकल कोहेन यांना या पैशांची भरपाई करून दिली. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, कोहेन यांना दिलेल्या रकमेची नोंद ही कायदेशीर शुल्काच्या स्वरूपात करण्यात आली आहे.