पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात; ठाकरेंची चिंता वाढली

मुंबई : गेल्या ६० वर्षांपासून देशाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली.

१ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असं पवार म्हणाले. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल,” असं शरद पवार यांनी जाहीर केलं.दरम्यान, या घोषणेनंतर आता राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे.

दरम्यान, पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेने ठाकरे गट (Thackeray Faction) आणि काँग्रेसची (Congress) चिंता वाढली आहे. महाविकास आघाडीतले कल्पतरु म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. शरद पवारांच्या आदेशाने महाविकास आघाडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पवारांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.