गोव्यात घमासान; काँग्रेस-भाजपमध्ये  सुरु आहे जोरदार रस्सीखेच; शिवसेनेच्या पदरी निराशा

पणजी : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

एक्झिट पोलनं उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि मणिपूरमध्ये भाजपची सरशी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्ता मिळवेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. उत्तराखंड आणि गोव्यात काट्याची टक्कर आहे आणि तिथं त्रिशंकू स्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान,  गोव्यात सुरुवातीचे सर्व कल हाती आले असून आतापर्यंत गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये घासून लढाई सुरु असल्याचं दिसतंय.

सुरुवातींच्या कलांमध्ये भाजप 15, काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर आहे. तर मगोप-तृणमूल 7 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर चार जागांवर आघाडीवर आहेत. प्रतिष्ठेची लढाई केलेल्या शिवसेनेला मात्र या कलांमध्ये कुठंही स्थान नसल्याचं समोर आलं आहे. गोव्यातील निवडणूक शिवसेनेनं प्रतिष्ठेची बनवली होती. तसेच भाजपसह सर्व पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी गोव्यात प्रचाराची धुरा सांभाळली होती. भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या चांगलीच चुरस दिसून येत आहे.