‘संजय राऊत यांच्या पक्षाचा साधा सरपंचही नाही, ते गोव्यात येऊन कोणाला भेटतात?’

पणजी : गोव्यात येत्या काही दिवसात निवडणूक येऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रानंतर आता गोव्यातही काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊ शकतात. निवडणूकपूर्व युतीबाबत शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

या बैठकीला गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश तोडणकर आणि प्रभारी दिनेश गुंडू राव हेही उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना गोव्यात 7 जागांची मागणी करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या गोव्यातील भेटी गाठी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्या या गोव्यातील वाढत्या मुक्कामावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना चांगलंच फैलावर घेतले आहे.

2022 मध्ये स्वयं पूर्ण गोव्यासाठी भाजपला निवडून देतील याची मला खात्री आहे. देवेंद्र फडणवीस पक्षाकडून गोव्याचे प्रभारी आहेत. त्यांचा अनुभव हा गोव्यातील लोकांना फायदेशीर ठरेल. संजय राऊत गोव्यात का येतात हे मला माहित नाही ! त्यांच्या पक्षाचा गोव्यात साधा सरपंचही नाही. त्यामुळे ते कुणाला येऊन भेटतात आणि काय करतात हे त्यांचे त्यांना विचारायला हवे, असा टोला प्रमोद सावंत यांनी लगावला आहे.