होतकरू विद्यार्थ्यांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत; पेपरफुटी प्रकरणावरून पडळकरांची टीका 

पुणे – आरोग्य भरतीच्या एकतीस ऑकटोबरला झालेला  पेपर लीक केल्याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . पेपर सेट करण्याची जबाबदारी असलेल्या डॉक्टर बोटलेंनी स्वतःच तो पेपर कसा फोडला आणि लातूरला आरोग्य विभागामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या प्रशांत बडगिरेने त्याचा बाजार मांडला असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून त्याच्या मार्फ़त ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राटं द्यायची, जेणेकरून पदभरतीमध्ये वसूलीचा घोडे बाजार चालवण्याची  आघाडी सरकारची  परंपरा राखता आली पाहिजे, आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळं पुराव्यानिशी सिद्ध झालेत.

हे सरकार आता अधिकृतरित्या वसूली सरकार म्हणून मान्यता प्राप्त झालेलं आहे. होतकरू विद्यार्थ्यांचा, उमेदवारांचा गळा आवळणाऱ्या घोटाळ्याचे धागे-दोरे थेट मंत्रालयापर्यंत  पोहचलेले आहेत. आणि या पेपर फुटीच्या लिंक आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यापर्यंत पोहचल्यात. म्हणजे या सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचंच अभय होतं का? असा सवाल उपस्थित होतोय.

आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे ? हे जनतेला कळालं पाहिजे. हे प्रकरण म्हणजे  सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे, या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायलयीन चौकशी झालीच पाहिजे. राज्य सरकारने जर याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ असं पडळकर म्हणाले आहेत.