पाकिस्तानमध्ये महागाईचा उच्चांक; दुधाचे दर 200 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता 

पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता दुधाच्या दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नुकतेच पेट्रोलचे दर सुमारे 12 रुपयांनी वाढले आहेत. यानंतर आता पाकिस्तानच्या डेअरी अँड कॅटल असोसिएशनने दावा केला आहे की दुधाचे दर वाढू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.
पाकिस्तानच्या मीडियाने दिलेल्या वृत्तात डेअरी आणि कॅटल असोसिएशनने दावा केला आहे की रमजान महिन्यात दुधाची किंमत 200 रुपये प्रति लिटरच्या पुढे जाऊ शकते. याशिवाय संघटनेने पाकिस्तान सरकारला इशाराही दिला आहे. धान्याच्या वाढत्या किमती रोखल्या नाहीत तर दुधाचे भाव वाढू शकतात.

याशिवाय चाऱ्याच्या दराचाही परिणाम दुधाच्या दरावर होणार आहे. दुग्धोत्पादकांना तृणधान्याच्या वाढत्या किमती आणि दुग्धजन्य पदार्थांवर लादण्यात आलेल्या करामुळे दुधाचे दर आणखी वाढतील, असे संघटनेचे म्हणणे आहे. याशिवाय येथे दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्यांच्या पदार्थात भेसळ दिसून येत असून ते 150 रुपयांपेक्षा कमी दराने दूध विकत आहेत.

नुकतेच पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात 12 रुपयांनी वाढ झाल्यानंतर त्याची किंमत 159.86 रुपयांवर पोहोचली आहे . याशिवाय पाकिस्तानमध्ये डिझेलच्या दरात सुमारे ९.५३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी रॉकेलच्या दरात प्रतिलिटर 10.08 रुपयांची वाढ झाली आहे.