‘एक दिवस योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान नक्की होतील अशी आशा आहे’

नवी दिल्ली – आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने अनेकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह अनेक मान्यवरांनी रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 25 मार्च 2022 रोजी पाच वर्षांच्या कालावधीनंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. यावेळी ते पहिल्यांदाच गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत.

दरम्यान, हिंदू युवा वाहिनी आणि विश्व हिंदू महासंघ (दिल्ली प्रदेश) यांच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये योगींचा जिवंत पुतळा बसवण्यात आला. यावेळी 50 दिवे प्रज्वलित करण्यात आले तसेच योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त विश्व हिंदू महासंघाने 50 किलोचा केक तयार केला असून, त्यावर बुलडोझरचा फोटोही टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विश्व हिंदू महासंघाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र सिंह म्हणाले की, बाबा जी बुलडोझरमुळे ओळखले जातात. आज सर्व राज्यांमध्ये बुलडोझरची कारवाई करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात गुंडांची राजवट संपली आहे, रस्ते चांगले झाले आहेत, राम मंदिर बांधले जात आहे. आम्ही सर्व कामात खूप आनंदी आहोत. एक दिवस ते पंतप्रधान होतील अशी आशा आहे.

दुसरीकडे हिंदू युवा वाहिनी, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष दिनेश अग्रवाल यांनी सांगितले की, महाराजांनी यावेळी उपस्थित राहावे अशी आमची इच्छा होती, आम्ही मंदिर आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांशी बोललो होतो. पण ते शक्य नसल्याने आम्ही हा पुतळा बनवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांचा वाढदिवस त्यांचे चाहते त्यांच्या पद्धतीने साजरा करत आहेत. यावेळी कामगार उत्साही दिसले आणि पुतळ्याला लाडू खाऊ घालण्याचा प्रयत्न करत होते.