कपड्यांचा रंग उडू नये म्हणून काय काळजी घ्यावी? पहिल्या धुण्यातच ‘हे’ उपाय केल्यास नवेकोरे राहतील कपडे

How To Wash Clothes Without Fading: वस्त्र अर्थातच कपडे हा माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. जितके नीटनेटके कपडे, तितका माणूस टापटीप दिसतो. रोज काहीतरी नवीन आणि स्टाइलिश घालण्यावर माणसाचा भर असतो. बाहेर पडताना वेगळे कपडे, ऑफिसला जाताना वेगळे कपडे, घरी असताना वेगळे कपडे, अगदी रात्री झोपतानाही लोक वेगळे कपडे घालतात. परंतु नवेनवे कपडे घेतल्यानंतर पहिल्या धुण्यातच त्यांचा रंग जाऊ लागतो. आणि पुढे जाऊन ते कपडे फिके पडू लागतात. अशावेळी पहिल्या धुण्यातच काही गोष्टींची काळजी घेतली, तर कपड्यांचा रंग उडत नाही.

कपडे बनवणाऱ्या कंपन्या अधिक नफा कमवण्याच्या नादात हलक्या रंगाचा वापर करतात. त्यामुळे लवकरच या कपड्यांचा रंग जातो. मात्र बऱ्याचदा ब्रँडेड कपड्यांबाबतही ही गोष्ट घडताना दिसते. अशावेळी काही उपायांनी तुम्ही कपड्यांचा रंग उडण्यापासून वाचवू शकता. परिणामी तुमचे कपडे दीर्घकाळ नवीन दिसतील.

रंग जाऊ नये म्हणून काय करावा उपाय ?
तुमच्या कपड्यांचा रंग जाऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी काही टिप्स फॉलो करा. एका बादलीत किंवा टबमध्ये गार, थंड पाणी घ्यावे. त्यामध्ये ७-८ चमचे मीठ आणि ४-५ चमचे बारीक केलेली तुरटी किंवा तुरटीची पावडर घालावी. हे सर्व पाण्यात नीट मिक्स होऊ द्यावे. नंतर या मिश्रणाच्या पाण्यातच तुमचे सुती कपडे भिजवावे आणि तासभर तसेच राहू द्यावेत. नंतर साध्या पाण्याने कपडे स्वच्छ धुवून टाकावेत. त्याचा परिणाम कसा होतो ते तुम्ही नक्कीच पाहू शकाल.

पण मीठ आणि तुरटीमुळे तुमचे कपडे कडक होऊ शकतात. हे टाळायचे असेल तर बादलीभर पाण्यात व्हिनेगर टाकावे आणि धुतलेले कपडे त्यात भिजवून नंतर वाळत घालावेत. यामुळे तुमचे कपडे अतिशय मऊ आणि सॉफ्ट राहतील.

(सूचना- हा लेख सामान्य समजुतींवर आधारित आहे. त्यात दिलेल्या सल्ल्यांचा अवलंब करण्यापूर्वी तज्ञांचा किंवा वैद्यकिय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)