मी बेईमान आहे की शब्दाचा पक्का, हे महाराष्ट्राला माहित आहे – अजित पवार

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांना चौकशीचा सामना करावा लागत आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. सध्या ईडीची केस ही कोर्टात सुरु आहे. मागील भाजप सरकारच्या काळात यावर सीआयडी, एसीबी, ईओडब्ल्यूची चौकशी झाली. न्यायधीशांच्या माध्यमातूनही एक चौकशी झाली. राज्यात केवळ जरंडेश्वर साखर कारखाना विकला गेलेला नाही. त्यामुळे या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी रितसर एक पत्रकार परिषद घेणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

महाराष्ट्रात सुरुवातीपासून किती व कोणाचे कारखाने विकले गेले आहेत, तसेच कारखाने विकण्याची कारणे अजितदादांनी माध्यमांपुढे मांडली. याप्रमाणेच बरेच कारखाने चालवण्यासाठी दिले जात आहेत. परंतु काहीजण जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

माध्यमातूनही सातत्याने त्या गोष्टी दाखवल्या जातात. मी मात्र सतत मीडियापुढे जाणारा माणूस नाही. मी वस्तुस्थितीला धरून चालणारा माणूस आहे. मी बेईमानी केली, अशी गरळ ओकण्याचे काम काहीजणांनी केले. मात्र मी ९० सालापासून राजकारणात सक्रीय आहे. संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखतो आणि मी बेईमान आहे की शब्दाचा पक्का आहे, हे जनता जाणते. जनतेचा पाठिंबा असल्याने मी कधीही खोटं बोललो नाही. लोकशाहीत लोकांना बोलण्याचा अधिकार असला तरी त्याच त्याच गोष्टी पुन्हा बोलून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचे अजित पवार म्हणाले.

तसेच महाराष्ट्रात अनेक घटकातील लोकांनी कारखाने घेतले आहेत. असे असताना या लोकांवर बोलले जात नाही, मात्र माझ्या कुटुंबियांबद्दल सातत्याने बोलले जात आहे. जरंडेश्वर कारखाना हा मुंबईतील गुरु कम्युनिटी या कंपनीने विकत घेतला आहे. त्यावेळी व्यवहार करताना सर्व गोष्टी पडताळून पाहण्याचे काम हे केंद्र किंवा राज्यातील यंत्रणेचे आहे. कोणाला यात न्याय मिळत नसेल तर पुढे कोर्टात जाण्याचा अधिकारही आहे, असे ते म्हणाले.

मागील काळात भुजबळ साहेबांचीदेखील अशी बदनामी केली गेली. त्यांच्या आयुष्यातील दोन वर्ष वाया घालवली. त्यांना क्लीन चीट मिळून सत्य समोर आले. जोवर चौकशी होऊन दूध का दूध व पानी का पानी होत नाही तोवर कोणीही काही येऊन मांडण्याचा प्रयत्न केला तरी त्यास त्यात खरे मानण्याचे कारण काय असा प्रश्न अजितदादांनी केला. या व्यवहारात कोणतीही चुकीची गोष्ट नाही, बेईमानी नाही, कुठेही फसवणुक झालेली नाही, असा ठाम दावा अजित पवारांनी केला.

हे ही पहा: