नवनीत राणांना काही झाल्यास तुरुंग प्रशासन जबाबदार; वकीलाचं तुरुंग अधिकाऱ्यांना पत्र

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसेचं (Hanumaan chalisa)  पठन करण्याची भूमिका घेतल्यामुळे चर्चेत आलेल्या नवनीत आणि रवी राणा ( Navneet -Ravi Rana)  या खासदार-आमदार दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. राणा दाम्पत्यावर सामाजिक तेढ निर्माण करणारी विधानं केल्याचा, पोलिसांच्या कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान,  तुरुंगात घरचं जेवण मिळावं आणि आपल्या जामिनासाठी राणा दाम्पत्याने अर्ज केलेला आहे. अशातच नवनीत राणा यांनी भायखळा कारागृहात (Byculla Jail) आपल्या तब्येतीची काळजी योग्य पद्धतीने घेतली जात नसल्याचं सांगत एक पत्र (Letter) लिहीलं आहे. या पत्रात माझ्या जिवाला काही झालं तर त्याची जबाबदारी जेल अधिकाऱ्यांची असेल असंही राणा यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा यांना स्पॉन्डलायसिसचा (Spondylosis) आजार आहे. त्यांच्या वकिलांनी प्रकृतीसंदर्भात तुरुंग प्रशासनाला पत्र लिहिलं आहे. माझ्या अशिल नवनीत राणा यांना तुरुंगामध्ये जमिनीवर बसायला आणि झोपायला लावण्यात आलं. त्यामुळे हा आजार वाढला.डॉक्टरांनी सी.टी. स्कॅनसाठी (C.T. Scan) विनंती केली. त्यासाठी अर्जही करण्यात आला. मात्र, त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. राणा यांना काही झाल्यास त्याची जबाबदारी तुरुंग अधिकार्यांची असेल, असं राणा यांच्या वकिलांनी पत्रात म्हटलं आहे. त्यांनी हे पत्र भायखळा कारागृहाच्या अधीक्षकांना लिहीलं आहे.