ठाकरेंना पुन्हा धक्का, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे करणार शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. आता उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसणार असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आज दुपारी दोन मोठ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

एबीपी माझाच्या माहितीनुसार, नागपूर अधिवेशनापासूनच याची सुरुवात झाली होती. उद्धव ठाकरे नागपुरात दाखल होताच, काही आमदारांनी नीलम गोऱ्हे यांची तक्रार केली होती. नीलम गोऱ्हे या उपसभापती असूनही आपल्याला बोलू देत नाहीत. आदित्य ठाकरेंच्या मुद्द्यावर ज्यावेळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाला घेरलं होतं. त्यावेळी उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे यांनी आपल्या आमदारांना बोलू द्यायला हवं होतं, असं आमदारांचं म्हणणं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही नीलम गोऱ्हेंना खडे बोल सुनावले होते, अशी माहितीही समोर आली होती.

त्यानंतर नीलम गोऱ्हेंचा शिंटे गटाकडे ओढा वाढत गेला. मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमांना त्या प्रोटोकॉल म्हणून उपस्थित असायच्या. तसेच, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलम गोऱ्हेंच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज अखरे दुपारी नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच, नीलम गोऱ्हेंसह ठाकरे गटातील आणखी दोन पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.