एका बाजूने हल्ला केला तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा प्रतिहल्ला होईल; दरेकारांचा शिवसेनेला इशारा 

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा (Navneet rana) यांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. नवनीत राणा यांच्या खारमधील इमारतीबाहेर शिवसेना(Shivsena)  कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील आपण इमारतीमधून बाहेर पडून मातोश्रीला जाणार आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणारच, असा निश्चत नवनीत राणा यांनी बोलून दाखवला आहे.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेला शिंगावर घेणारे  भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. मातोश्रीजवळील कलानगर सिग्नलजवळ (Kalanagar signal)  हा हल्ला करण्यात आला आहे. मातोश्रीबाहेरील रस्त्यावरून मोहित कंबोज यांची गाडी जात होती. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकरत्यांनी त्यांची गाडी ओळखली आणि त्यांच्या कारवर हल्ला केला.

या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच लोक कायदा हातात घेत आहेत असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. अलिकडच्या काळातील घटना पाहिल्या तर एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी स्थिती असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.  सत्ता येत असते जात असते. पण सत्तेचा उन्माद आणि सत्तेचा वापर करुन राज्यात अशी गुंडगिरी कधीच झाली नसल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.  एका बाजूने हल्ला केला तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा प्रतिहल्ला होईल असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.