सोमवारपर्यंत कामावर न आलेल्या कामगारांवर कारवाई केली जाईल – परब 

 मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या संप काळांत निलंबित करण्यात आलेले कर्मचारी सोमवारपर्यंत जर कामावर रुजू झाले तर निलंबनाची कारवाई रद्द केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिलं.

एस टी कर्मचाऱ्यांना एक संधी द्यावी या उद्देशानं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आदेश आणि विलिनीकरणाच्या बाबतीत अहवाल सादर करण्यास बारा आठवड्यांची मुदत, या पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारला कोणताही निर्णय घेणं अवघड असल्याचं ते म्हणाले.

सोमवारपर्यंत कामावर न आलेल्या कामगारांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.गेल्या एक महिन्यांहून अधिक काळ एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्र्यांनी राज्यभरातील आगारातील बसगाड्यांचा तसंच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा काल आढावा घेतला.