गर्दी जमवण्यासाठी ही वेळ मुख्यमंत्र्यांवर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे – अजित पवार

मुंबई   – पैठण येथील सभेला गर्दी जमवण्याकरीता अंगणवाडी सेविकांना, मदतनीस, पर्यवेक्षिकांना उपस्थित राहण्याचे पत्र काढावे लागते ही वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला येण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना लेखी स्वरूपात पत्र काढत आदेश दिला जातो याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाचे पत्रच अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.मंत्र्यांच्या निर्देशाशिवाय अधिकारी आदेश काढू शकत नाहीत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हिवाळी अधिवेशनापर्यंत उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. आमदारांची नाराजी वाढेल. पालकमंत्री नेमलेले नाहीत. पालकमंत्र्यांच्या यादीत इच्छूकांची संख्या जास्त असल्याने या नेमणूका रखडल्या आहेत. राज्यावर अनेक संकटे येत आहेत. नुकतीच अतिवृष्टी आणि आता ढगफुटी झाली. धरणाचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे त्याखालील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष द्यायला कोण आहे. कुणावरतरी जबाबदारी नेमायला हवी होती. स्वातंत्र्यदिनी २० लोकांना झेंडावंदन करता आले इतर १६ ठिकाणी प्रशासकीय अधिकार्‍यांनी झेंडावंदन केले हे लोकशाहीमध्ये मान्य होणारी गोष्ट नाही. कारण लोकांनी निवडून दिलेल्या लोकांना नेमा परंतु जो काही कारभार सुरू आहे त्या कारभाराचा धिक्कार व निषेध अजित पवार यांनी यावेळी केला.

राज्याच्यावतीने आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली असताना मी कसा बोलणार होतो;अधिवेशनात राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्षांनी बोलणं अपेक्षित असतं, त्यामुळे मी बोलणं टाळलं…

दिल्लीमध्ये दोन दिवसाचे पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी मार्गदर्शन केले. शिवाय इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. आमच्या राज्याच्यावतीने आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याची भूमिका मांडली. या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष यांनी बोलणं अपेक्षित असतं त्यामुळे मी बोलणं टाळलं असे स्पष्ट करतानाच माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला. वास्तविक मला तिथे कुणी बोलू नका असं सांगितलं नाही. मीच माझी भूमिका त्याठिकाणी घेतली. मी एकटाच बोललो नाही असं नाही तर वेळेअभावी सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण बोलू शकले नाहीत. दोनवेळा वॉशरुमला गेलो म्हणून वेगळा विषय चालवण्यात आला. कारण नसताना गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. वस्तुस्थिती आधारित बातम्या देण्याची जबाबदारी माध्यमांची आहे मी राज्यात गेल्यावर माध्यमांसमोर बोलणार आहे असेही सांगितले होते. १९९१ ला खासदार झालो म्हणजे ३१ वर्षे झाली तेव्हापासून सहसा मी राष्ट्रीय पातळीवर उपस्थित राहतो परंतु मी मार्गदर्शन करत नाही राज्यात सभा, अधिवेशनात मी बोलतो माझी भूमिका स्पष्ट करतो. त्यामुळे तुमचे गैरसमज दूर करुन राज्यासमोरचे सध्याचे प्रश्न व राज्यसरकारची चुकीचे धोरणं मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.