कुणीपण उठतो आणि रिव्हॉल्व्हर काढतो… हे काय बिहार – युपी आहे का?…

मुंबई  –  राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असताना आणि गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला असताना ठाकरे व शिंदे गटात हाणामारी झाल्याचे समजले. कुणीपण उठतो आणि रिव्हॉल्व्हर काढतो… हे काय बिहार – युपी आहे का? असा सवाल करतानाच मला या राज्यांची बदनामी करायची नाही. नाहीतर म्हणतील या राज्याची बदनामी करतोय परंतु एका सत्ताधारी पक्षाचा आमदार असं करायला लागला तर राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही? गृहमंत्री काय करत आहेत? पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही.राज्याच्या हिताचे नाही असे खडेबोल  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सरकारला  सुनावले.

मध्यंतरी एका आमदाराने तंगड्या तोडण्याची भाषा केली होती त्यावेळी विधानसभेत या वर्तनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या आमदारांना समज द्यावी असे सांगितले होते परंतु तरीसुद्धा तोच प्रकार सुरु आहे. हे काय चाललंय असा संतप्त सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.

मी नास्तिक नाही परंतु राज्याच्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने दर्शनासाठी किती वेळ घालवायचा त्यालापण काही मर्यादा असतात. आपल्या राज्यात पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होतोय असं नाही असा टोला लगावतानाच मिरवणूका किती काळ चालवायच्या याला काही बंधने असावीत. आवाजाची मर्यादा नव्हती. ३६ तास मिरवणूका चालल्या याकडेही सरकारचे लक्ष वेधले.

जग कुठे चाललंय आणि यांचा पितृपक्षाने कार्यभार अडलाय…

पितृपक्ष असल्याने बर्‍याच मंत्र्यांनी कार्यभारच स्वीकारला नाही असं कळतं. बरेच मंत्री मंत्रालयाच्या कार्यालयात गेले नाहीत. याबाबत बातम्यांचे कात्रण दाखवत अजित पवार यांनी असं कुठे असतं का? जग कुठे चाललंय याकडेही जनतेचे लक्ष वेधले.

मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड कामाचा ताण असतो आणि त्यात देवदर्शन करुन आम्हाला गणपतीलाही जाऊन ते सगळं बघून फाईल काढायच्या आहेत आणि त्यात असे मेळावे कुठे – कुठे घ्यायचे आहेत आणि गर्दी होत नाही म्हणून तिथे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांना गोळा करायचं असा उपरोधिक टोला लगावतानाच अरे हे काय चाललंय असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.