Pune: पत्नीने नाकावर ठोसा मारल्याने पतीचा मृत्यू, लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याने संताप

Pune News: लग्नाच्या वाढदिवशी (Wedding Anniversary) गिफ्ट न दिल्याच्या कारणावरुन पत्नीने पतीच्या नाकावर जोरदार ठोसा मारला, ज्यामुळे पतीचा दुर्देवी मृत्यू झाला. पुण्यातल्या वानवाडी भागात ही घटना घडली आहे. वानवाडी भागात गंगा सॅटेलाइट नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे. त्या सोसायटीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. निखिल पुष्पराज खन्ना (वय-३६ ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी निखिल खन्नाची पत्नी रेणुका खन्नाला अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका आणि निखिल या दोघांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता. निखिल हे पत्नी रेणुका आणि त्यांच्या आई वडिलांसह राहात होते. पतीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलं नाही तसंच दुबईला घेऊन गेला नाही या कारणावरुन दोघांचं शुक्रवारी भांडण झालं. दुपारी साडेबाराच्या सुमारास रेणुकाने निखिलच्या नाकावर ठोसा मारला. या घटनेत निखिल यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं आणि बराच रक्तस्राव झाला. या घटनेनंतर रेणुकाचे सासरे आणि निखिल यांचे वडील डॉ. पुष्पराज खन्ना यांनी निखिलला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र निखिलने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी रेणुकाला अटक केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुलांना शाळेतच देण्यात यावे रामायण-महाभारतचे धडे; NCERT पॅनेलची शिफारस

सर्वात प्रथम बोलणारा रोहित भाईच होता…; टीम इंडियातून सातत्याने दुर्लक्षित राहणाऱ्या संजूचा खुलासा

आडनावापुढे पाटील लावता, आर्थिक मागास म्हणता आणि १०० जेसीबीने फुलांची उधळण करता : अंधारे